Thursday 6 October 2016

किशोर पटेल लिखित कथा बंडूची:१
बरा न होणारा आजार

एक गोष्ट बंडूला समजत नव्हती. एरवी बेंकेत चांगले वागणारे सहकारी चर्चगेट स्टेशनवरून सुटणाऱ्या बसमध्ये बसल्यावर त्याच्या नजरेला नजर का देत नव्हते?

असेल. मी इकडे ह्या शाखेत नवीन आहे ना? ओळख झाली कि मग लोक हात करणार, नमस्कार करणार, कसं काय मग, ट्रेन मध्ये रमीत किती प्लस वगेरे विचारणार. एखादा गुडमोर्निंग सुध्धां म्हणणार. थोडे दिवस जाऊ दे.

थोडे दिवस गेले. बंडूच्या ओळखी वाढल्या. काही जणा बरोबर सुत जमलं. दुपारी जेवायला आणि नंतर फिरायला कंपनी मिळू लागली.

पण बसमधली ती गोष्ट बंडूच्या समजण्या पलीकडची होती. अजून काल संध्याकाळी ज्या माणसाला बंडूने चहा पाजला होता त्याने सुध्धां आज सकाळी बसमध्ये बंडूला ओळख दाखवली नाहीं.

बंडू नवीन होता. भोळा होता. असेल, काही तरी कारण असेल. ते बोलवत नाहीं महणून आपण काय गप्प बसायचं? बंडूने त्याला नमस्कार म्हटलं. योगायोग असा झाला कि कंडक्टर प्रथम बंडूकडे आला. बंडूने आपल्याबरोबर त्या मित्राचं पण तिकीट काढलं.    

एकदा बंडू पुढे बसला होता. पुढे बसलं कि मेकर टावरच्या स्टोपला उतरून धावत जाऊन लिफ्टच्या लाईनीत नंबर लावता येतो. एकाने मागन आवाज दिला, ‘काय बंडू, कसं काय, काय बातमी नवा काळ मधे?’

त्या माणसाने ओळख दाखवली महणून बंडू सुखावला. किती चांगला माणूस हा! बंडूने त्याला नवा काळ वाचायला दिला. आणि हो, त्याचं तिकीट सुध्धां काढलं.

सकाळी कामावर जातांना किंवा संध्याकाळी परतताना कोणीही आवाज दिला कि बंडू त्याचं तिकीट काढायचा.

बंडूच मन मोठ होत पण खिसा त्यामानाने छोटा होता. त्याचे पैसे लौकर संपायला लागले.

“आपले पैसे लौकर का संपतात?” ह्या विषयी खूप विचार करून बंडू अस्वस्थ झाला. त्या अस्वस्थ अवस्थेत त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. चर्चगेट आणि कफ परेडस्थित मेकर टावर मधलं साधारण तीन किलोमीटरचे अंतर त्याने चालत जायचं ठरवलं. व्यायामचा व्यायाम आणि वरून पैसेची बचत.

काही दिवस बरे गेले. तब्येत बरी राहिली. पण बसचे वाचलेले पैसे आता चांभाराला जायला लागले. बाटाचे सेकंड्स मधे घेतलेल्या बुटाचा नकाशा पार बदलला. कोल्हापुरी चंपलेच्या किंमतीपेक्षा रिपेरिंगचा खर्च जास्त झाला. बंडू पुन्हा विचारात पडला. आपण करायचं तरी काय?

एवढ मोठ अंतर रोज पायी कापणे शक्य नाहीं. बसचा प्रवास टाळता येत नाहीं. त्यावर आता एकच उपाय. पोकेटमनी वाढली पाहिजे. सगळे प्रश्न आपोआप सुटतील.

बंडूने अर्थमंत्र्यांकडे अर्थात आपल्या पत्नीकडे चार्टर ऑफ डिमांड सादर केला. “पोकेटमनीमध्ये वाढ” एवढच अजून तो बोलला तेवढ्यात बायको एकदम अंगावर आली. “का?” ह्या एकाक्षरी प्रश्न अर्थमंत्र्याने विचारला आणि बंडूची एक कलमी मागणी फेटाळली गेली. द्विपक्षी कराराची बोलणी संपली. पोकेटमनी वाढला नाहीं!

बंडू आजारी पडला. बेंकेच्या बाकीच्या स्टाफला जो आजार झाला होता तोच आजार बंडूला झाला.   
शांतपणे विचार करून बंडूने ह्या आजाराची लक्षणे शोधून काढली.

१. कंडक्टरचा टाईमिंग बघून लोक ओळख दाखवतात.
२. आपापली तिकीट काढून होईपर्यंत कोण कोणाशी बोलत नाहीं.
३. दुसर्याचे तिकीट घेऊन झाले असेल तेव्हां काही जण मुद्दाम बोलतात, “बंड्या, मी तिकीट काढतो, बरं का?”
आणि ४. सर्वांची तिकीट काढून झाली कि हा आजार नाहीसा होतो.

थोडक्यात म्हणजे:

बसमध्ये ओळख न दाखवणे हा एक सामूहिक आजार आहे. प्रत्येक आजाराला काही न काही औषध असतं पण ह्या अनोळखी आजाराला औषध नाही.
* * *
(एकूण शब्द ४६४)
Disclaimer: Photograph along with story is for representative purpose only. It's taken from net. Photographer unknown.